हिंगोली - शहरात पहिल्यांदाच दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्यामुळे हिंगोलीची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. चोरट्याने पलायन केलेल्या दुचाकीवर सरकार असे नाव असल्याचे एका महिलेने पाहिले, त्यावरून पोलीस विभागाने चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुचाकीवर काका, दादा, भाऊ, सरकार, असे नाव असणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारत वाहतूक शाखेने चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईमुळे दादा, भाऊ मात्र पोलिसांसमोर चांगलेच जेरीस आल्याचे दिसून आले.
दुचाकीमध्ये काहीतरी आगळावेगळा बदल करून दुचाकी चालवने ही आज कालच्या तरुणाईची फॅशनच होऊन बसली आहे. काही दुचाकीस्वार कर्णकर्कश्श हॉर्न वाजवत भर वेगात गर्दीतून दुचाकी चालवत असल्याचेही समोर आले आहे. एवढेच नव्हे तर दादा, भाऊ, काका वर असलेले प्रेमही नंबर प्लेट मधून उफाळून येत आहे. ही क्रेज थांबली नाही तर तर फॅन्सी नंबर प्लेटनेही तरुणांना चांगलीच भुरळ घातलेली आहे. यामुळे विविध प्रकारांच्या फॅन्सी नंबर प्लेटचा हिंगोली जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातलाय. अधून मधून सुरू असलेल्या वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाईचा बडगा यामुळे काही प्रमाणात ही क्रेझ कमी- कमी होत चालली होती. मात्र, दिवसाढवळ्या हिंगोली शहरात पाच ठिकाणी झालेल्या घरफोडी मुळे पोलीस यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. नाव दिसेल त्या गाडीला ताब्यात घेत कागदपत्रांची तपासणी सुरू केली. अशात दादा, काका, भाऊ असे नाव घेऊन मिरविणाऱ्या दुचाकीस्वारांची मात्र आज चागलीच फजगत झाल्याचे पहायला मिळाले. नाव असलेल्या दुचाकीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दुचाकीस्वारामध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरीच्या घटनेपासून वाहतूक शाखेने विना नंबर तसेच विविध प्रकारची नावे असणाऱ्या दुचाकी वाहतूक शाखेमध्ये लावून कागदपत्रे असणाऱ्या दुचाकीस्वारांना स्वाधीन केल्या जात आहेत. यामध्ये अनेक दादा भाऊ काका चांगलेच जेरिस आल्याचे पहावयास मिळाले. काही काही दादाभाऊ तर पोलिसांसमोर लोटांगणही घालत होते. हा कारवाईचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.