हिंगोली - जालना येथून कळमनुरीकडे दुचाकीने जाणाऱ्या एका मजूर महिलेची हिंगोली जिल्ह्यातील दलालढाबा येथे रस्त्यावरच प्रसूती झाली आहे. त्यावेळी तत्काळ आजूबाजूच्या महिला या प्रसूती झालेल्या महिलेच्या मदतीसाठी धावून आल्या. यावेळी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ आणि माता सुखरूप आहेत. ज्योती शेळके, असे या महिलेचे नाव आहे.
याबात अधिक माहिती अशी की, जालनामधून 20 ते 25 मजूर एका टेम्पोतुन कळमनुरीकडे जात होते. यामध्येच ज्योती ही आपल्या पतीसह येत होती. मात्र, ज्योती गर्भवती असल्यामुळे आपल्या मामाच्या मुलाच्या दुचाकीवरून गावी परतत होती. रस्त्यावर जागोजागी पोलीस तैनात असल्याने पोलिसांची नजर चुकवून ते मार्ग काढत होते. त्यावेळी ते ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी मार्गे जात असताना जलालधाबा येथे पोहोचताच ज्योतीला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. तेव्हा मामाच्या मुलाने रस्त्याच्या कडेला असलेल्या आखाड्यावरील महिलांना मदत मागणी केली. त्यावेळी महिलाही मदतीसाठी तत्काळ धावून आल्या. अन् ज्योतीने गोंडस मुलीला जन्म दिला.
घटनेची माहिती समजताच पिंपळदरी येथील समाजसेवक बापूराव घोंगडे यांनी घटनास्थळी पत्नीसह धाव घेत आवश्यक ती मदत केली. घोगंडे यांनी ज्योतीला तातडीने पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. सध्या बाळ आणि माता दोघे सुखरुप आहेत.