हिंगोली- महागाईने सर्व जनता होरपळून निघत आहे. खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. मुख्य म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी अती महत्त्वाचे असणाऱ्या गव्हाचे भाव पाहून तर डोकेच गरगरायला लागले आहे. मात्र, असे असताना सण, समारंभात उरलेले शिळे अन्न फेकून देण्यावर सर्वाधिक जास्त भर असते. मात्र, अशाच फेकून दिलेल्या अन्नातील शिळ्या पोळ्या उपयोगात आणून गुरांचे खाद्य बनविण्याची नवीन शक्कल सेनगाव येथील एका व्यक्तीने लढवली आहे.
कलीम शेख (रा. सेनगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे. शेख यांचा गादी बनविण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्यातून गाद्या बनविण्यासाठी येतात. एवढेच काय तर, त्यानी गादीसाठी हा जिल्हाच पायाखाली घातला आहे. त्यांनी बनविलेल्या गाद्यांना लग्नसमारंभात सर्वाधिक जास्त मागणी असते. त्यामुळे, आवर्जून ते कोणत्याही लग्न समारंभाचा कार्यक्रम टाळत नाहीत. मात्र, जेव्हा कधी ते लग्न समारंभात गेले त्यावेळी समारंभातील उरल्या पोळ्या फेकून दिल्या जात असल्याचे त्याना पाहावे ना. ते नेहमीच या पोळ्या संदर्भात विचार करायचे. दरम्यान, त्यांना एक कल्पना सुचली. लागलीच कसलाही विचार न करता त्यांनी थेट उरलेल्या शिळ्या पोळ्या जमा करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या वाळवून त्यांचा यंत्रामधून बारीक बुगा करत त्यासोबत विविध प्रकारच्या डाळी, गव्हाची चुरी, हरबऱ्याच्या डाळीचे टर्पल याचे मिश्रण करून त्याचे पशुखाद्य बनविण्यास महिना भरापासून सुरुवात केली.
वाळवून अन्न मिश्रण केल्याने यापासून तयार होणारा बुगा हा अतिशय चविष्ट बनत आहे. त्याची पॅकींग करून हा बुगा थेट गुजरात राज्यासह चंद्रपूर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी निर्यात केला जात आहे. या सर्व प्रक्रियेमुळे अन्नाची तर नासाडी थांबतेच वरून शिळ्या पोळ्या खरेदीतून इतरांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. भंगार जमा करणारे आता शिळ्या पोळ्या देखील जमा करीत आहेत. त्या शिळ्या पोळ्या दोन किंवा तीन रुपये किलो प्रमाणे खरेदी केले जाते. कलीम शेख यांच्या नव्या व्यवसायामुळे त्यांच्याकडे लग्न समारंभासह विविध कार्यक्रमात शिल्लक राहिलेल्या शिळ्या पोळ्या वाहनाने येऊ लागल्या आहेत. शेख यांनी स्वतःच्या कल्पनेतून सुरू केलेल्या व्यवसायामुळे उकिर्ड्यावर जाणाऱ्या पोळ्या आता पुन्हा पशूंच्या आहरात सामाविष्ट झाल्या आहे. त्यामुळे, अन्नाची विल्हेवाट लावण्याची गरज पडत नाही.
या व्यवसायामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच उकिरड्यावर पडणाऱ्या पोळ्या पशूंचे खाद्य बनत आहे, याचे मला फार समाधान वाटत आल्याचे शेख कलीम यांनी सांगितले. आता या खाद्याला खूप मागणी येत आहे. येत्या काही दिवसात पोल्ट्री फॉर्मचे देखील खाद्य बनविणे सुरू करणार आहे. या व्यवसायात शेख यांचे संपूर्ण कुटुंबच मदत करत आहे. शिळ्या भाकरी बुगा करण्या अगोदर त्या काळजीपूर्वक पुसल्या जातात. नंतरच त्यांचा बुगा व त्यामध्ये डाळ मिश्रित केली जाते. आजही सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेरोजगार लोक कामाच्या शोधात जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी धाव घेतात. मात्र, व्यवसाय तर आपल्या अवती भोवतीच असतो हेच शेख कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे.
हेही वाचा- दारू दुकानाचे परवाने रद्द करण्यासाठी महिला जिल्हास्तरीय कार्यालयात, अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ