हिंगोली - संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरात लॉकडाऊन असून प्रशासन वारंवार सूचना देत असतानाही नागरिक सर्रास घराबाहेर पडताना दिसत आहेत. याच नागरिकांना श्रुती तनपुरे या गायिकेने गाण्याच्या माध्यमातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
'जाऊ नका तुम्ही बाहेरी, कोरोना येईल आपल्या घरी', असे या गाण्याचे बोल आहेत. हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 16 वर पोहोचली असून जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. ही परिस्थिती निर्माण झालेली असतानाही लोकांना जराही गांभीर्य राहिलेले नाही.
अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे, हा विषाणू किती भयंकर आहे आणि त्याची लागण न होऊ देण्यासाठी काय काय काळजी घ्यायला हवी, हे गीतातून सांगण्याचा गायिकेने प्रयत्न केला आहे.