हिंगोली - वसमत तालुक्यातील वापटी येथे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबीयांच्या भांडणात एका नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी(दि. 24ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली आहे. स्वराज शिंदे असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शिंदे आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबात शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. शाब्दीक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. स्वराजची आई स्वराजला काखेत घेऊन भांडण सोडवण्यासाठी पुढे गेली असता, झालेल्या झटपटीत स्वराज खाली पडला. त्यावेळी त्याला मार लागल्याने तो रडायला लागला. त्यानतंर त्याला तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी स्वराजला मृत घोषित केले.
या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शिंदे कुटुंबीय कुरुंदा पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. तर, समोरील कुटुंबदेखील गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात दाखल झाले होते. दोन्ही कुटुंब आमने-सामने आल्याने पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण आहे. शिवाय, वापटी गावातदेखील तणावग्रस्त वातावरण आहे. लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबात वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.