हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. कनेरगाव - गोरेगाव मार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकी आणि ऑटोची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात ८ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला असून इतर ५ जण जखमी झाले आहेत.
कनेरगाव - गोरेगाव मार्गावर एम. एच. ३७. जी.४९५८ या क्रमांकाचा ऑटो प्रवासी घेऊन चालला होता. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपावरून दुचाकी पेट्रोल भरून येत होती. अचानक ऑटो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादातच ऑटो आणि दुचाकीस्वाराची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती ही धडकेनंतर ऑटो पलटी झाला. या अपघातात गौरी नावाच्या ८ महिन्याच्या चिमुरडीच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर इतर ५ जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती कळताच कनेरगाव नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आले असून मृत गौरी आणि तिच्या नातेवाईकांना फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
: