हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढत होत चालली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका चार वर्षीय मुलाचा देखील समावेश असल्याचे अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यांमध्ये खळबळ उडाली. आता 276 कोरोनाबाधित रुग्ण संख्या झाली आहे. तर 238 रुग्ण हे बरे झाले आहेत.
नव्याने आढळलेल्या रुग्णापैकी पिंपळखुटा येथील रहिवासी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो हिंगोली जिल्ह्यात परतल्यानंतर त्याला शासकीय क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचा अहवाल आता पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. हिंगोली शहरातील बायपास भागात असलेल्या प्रगती नगर येथील एका पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सदरील रुग्ण हा मुंबई येथून परत आलेला आहे. हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील दोघांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्यांनादेखील तोरणा वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. औंढा नागनाथ येथील सेंटरमध्ये दाखल असलेल्या चार वर्षाच्या बालकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सदरील बालक हा औंढा नागनाथ तालुक्यातील भोसे येथील रहिवासी आहे.
एकंदरीतच वाढत्या रुग्ण संख्येत भर पडत असल्याने आज घडीला हिंगोली जिल्ह्यात 276 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली असून 238 रुग्ण हे बरे झाले आहेत. आता विविध कोरोना वार्डमध्ये 38 कोरोना बाधित रुग्णावर उपचार सूरु आहेत. तर 257 जणांचे अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.