हिंगोली - कॅनॉलमध्ये बैलगाडी कोसळून २ बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर धूरकरी या घटनेत बालबाल बचावला. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे ही घटना घडली. आज (सोमवारी) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
शेतकरी पांडुरंग काळे हे बैलगाडीवर एका शेतातून दुसऱ्या शेतात जात होते. कॅनॉल जवळ गेल्यानंतर अचानक समोर आलेल्या रान डुकरामुळे बैल बिथरले. यानंतर बैल गाडीसह सुसाट पळत होते. गाडीचा आवाज येत असल्याने ते अजून जोरात पळत सुटले. काळेंनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. तोच कॅनॉल जवळ गेल्यानंतर काळे यांनी गाडीतुन उडी घेतली. यानंतर बैलगाडी थेट कॅनॉल मध्ये कोसळली.
हेही वाचा - भाववाढ रोखण्याची कसरत; आयातीच्या ७९० टन कांद्याची देशात आवक
कॅनॉलमध्ये मुबलक पाणी असल्याने बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जेसीबीच्या सहायाने बैल बाहेर काढण्यात आले. घटनेची, माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तसेच महसूलच्या कर्मचाऱ्यांनीही धाव घेत पंचनामा केला. यानंतर दोन्हीही बैलांची पूजा करीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर यात शेतकरी काळे यांचे अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.