गोंदिया- जिल्ह्यात २४ फेब्रुवारीला जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पाऊस आणि गारा पडल्यामुळे रब्बी पिकांसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना किती भरपाई मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्या अवकाळी पाऊस पडणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वादळी पाऊस आणि गारपिठीमुळे एकूण १६०९ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली असून ८३ लाख ४२ हजार रूपयांचे नुकसन झाल्याचे समोर आले आहे. अचानकपणे आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिठीमुळे कौलारू घराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील छत उडाले त्याचबरोबर गोठ्यांवरही झाडांची पडझड झाली. अवकाळी पाऊस व गारपिठीचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया आणि आमगाव या तालुक्याला बसला आहे. अवकाळी पावसामुळे सालेकसा तालुक्यातील पशुपक्षींना मोट फटका बसला असून परिसरात पोपटांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे.
आमगाव तालुक्यात ४१ घरे आणि गोठे, सालेकसा तालुक्यात १४८० घरे आणि गोठे, सडक अर्जुनी तालुक्यात ६२ घरे आणि गोठे व गोंदिया तालुक्यात १३ आणि तिरोडा तालुक्यात ४ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. यामुळे ८३ लाख ४२ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या यंत्रणेतंर्गत करण्यात आले आहे. त्याचबरोबर, ७०२ हेक्टरमधील रब्बी पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून भरपाई जाहीर होई पर्यंत नुकसानग्रस्तांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्यात उद्या अवकाळी पावसासह गारपीठ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा- रस्त्यासाठी कलपाथरीच्या शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण, आईचाही सहभाग