गोंदिया - सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहे, प्रचाराला ही जोर आलेला आहे. त्यातच, गोंदिया मतदारसंघात गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसला राम-राम करत भाजपप्रवेश केला. त्यांना भाजप उमेदवारीही देण्यात आली. तर, भाजपमधून विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. तसेच भाजपच्या बहुतांश कार्यकर्त्यांचा पाठिंबा अग्रवाल यांना असून ते अपक्ष निवडणूक लढत आहेत.
भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या पत्नी माधवी अग्रवाल यांनी 2 ऑक्टोंबर रोजी अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या पत्नी सविता अग्रवाल यांना व्हाट्सअॅप वरून एक संदेश पाठवला. यात, आम्ही 25 वर्ष सत्तेची मलाई खाल्ली आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही. आम्ही पुढील 25 वर्षे पुन्हा सत्तेत राहू, तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही आमच्या सोबत या असा उल्लेख होता. या प्रकरणावरून आता रान माजले आहे.
हेही वाचा - विनोद अग्रवालांची मनधरणी करण्यासाठी आलेले परिणय फुके 'फेल'
गोपालदास अग्रवाल यांनी सत्तेचा गैरवापर केला असल्याची तक्रार सविता अग्रवाल यांनी मुख्य निवडणूक आयोग मुंबई जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी पोलीस अधीक्षक, भ्रष्टाचार निर्मूलन व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली. आपल्याकडे उमदेवी अग्रवाल यांच्या मोबाईल क्रमांक नव्हता. कधी मोबाईलवर बोलणे पण झाले नाही अशी माहिती सविता अग्रवाल यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आधीच जुनी भाजप आणि नविन भाजप यांच्यात रणकंदन सुरू असताना या मुद्द्यामुळे या दोघांत पुन्हा रान पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह १० लाखांचा माल जप्त