गोंदिया - धान खरेदीचे बिल ऑनलाईन करून देण्यासाठी प्रति बिलामागे 200 रुपये लाच घेताना टेमणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह संगणक चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नरेश तिवारी, सुशील कटरे अशी त्या दोघांची नावे आहेत.
हेही वाचा - योगायोग...! आजी-माजी मुख्यमंत्र्याचा 'या' एकाच अधिकार्यावर विश्वास
तक्रारदार व त्याच्या पुतण्याने त्यांच्याकडील धान टेमणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेले होते. यावेळी धानाचे वजन केल्यावर बिल ऑनलाईन करण्यासाठी कटरे यांनी त्यांच्याकडे प्रति बिल 200 रुपयांची मागणी केली. मात्र, त्यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली.
लाचलुचपत विभागाच्या पथकाने टेमणी धान खरेदी केंद्रावर ग्रेडर कटरे यांना अध्यक्ष तिवारी यांच्या संगनमताने तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. दोघांवर गोंदिया ग्रामीण पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.