गोंदिया - शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून जनता कर्फ्यू लावण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह व्यापा-यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार गोंदिया नगरपरिषदेने शनिवार व रविवार हे दोन दिवस जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव, देवरी, तिरोडा या तालुक्यातही जनता कर्फ्यू आहे. जिल्ह्यातील ४ तालुक्यात आज व उद्या नगरपरिषद व नगर पंचायतद्वारे जनता कर्फ्यू असल्याने या जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांसह लोकांनीही १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 495 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 257 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 238 सक्रिय रुग्णांवर उपचार चालू आहेत.
तिरोडा तालुक्यात दीडशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. बाहेरून येणाऱ्यांची संख्या या तालुक्यात जास्त आहे. त्यामुळे येथे तीन दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुक्यातही जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. रुग्णालय, मेडिकल, दूध पुरवठा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.