गोंदिया- नगर पालिकेतील कंत्राटी अभियंता आणि नियोजन सभापतींना ८ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. कुडवा येथील प्लॉटसाठी स्थायी अकृषीक परवाना देण्याकरीता लाचेची मागणी केली आहे. ही कारवाईची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे.
यामध्ये शशी छोटेलाल पारधी (कनिष्ठ अभियंता कंत्राटी नगर रचना विभाग) गोंदिया आणि पालिकेच्या नियोजन व विकासचे सभापती सचिन गोविंद शेंडे अशी त्या लाचखोरांची नावे आहेत. दोघांनी तक्रारदारांकडुन ८ हजारांची लाच मागणी केली होती.
गोंदिया पालिकेतील सर्व विभागातील सभापती मोठ्या प्रमाणात लोकांची कामे करून देण्याकरीता लाचेची मागणी करतात. अशी चर्चा शहरात असताना गोंदिया नगर पालिकेतील नियोजन व विकास सभापती सचिन शेंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी तक्रारदार हे कुडवा येथील जिवन बिमा कंपनीचे एजंट असून त्यांचा मालकीचा प्लॉट आहे. या प्लॉटचा स्थायी अकृषिक परवाना (एन.ए.) करण्यासाठी तक्रारदाराने नगर पालिकेच्या नगररचना विभागात आवश्यक दस्तावेज सादर केले. तरीही परवाना काढुन देण्यासाठी शशि पारधी याने तक्रारदारास ८ हजार रूपयांची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबतची एसीबीच्या पथकाकडे तक्रार केली. शनिवारी (९ जुलै) नगरपालिकेतील नियोजन सभापतीच्या कक्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा ने सापळा रचला. दरम्यान, कंत्राटी अभियंता शशि पारधी व गोंदिया पालीकेतील नियोजन सभापती सचिन शेंडे हे ८ हजारांची रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकांनी दोघांना अटक केली. या दोघांवर शहर पोलीस ठाणे, गोंदिया येथे कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ सुधारित अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.