गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत तीन संशयीत नक्षलवांद्यांना सालेकसा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती सालेकसा पोलिसांनी दिली.
सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. विशेषतः छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्यामुळे या भागात अनेकदा नक्षल्यांच्या हालचाली असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे मागील महिन्यात 17 ऑक्टोबरला देवरी तालुक्यातील डोंगरगाव या गावात मडावी नामक व्यक्तीच्या घरातून नक्षली स्फोटके, 21 जिवंत डिटोनेटर मिळाले होते. तसेच 4 दिवसानंतर विधानसभा मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिसाचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून काही नक्षलवाद्यांनी मुरकूटडोह येथे राहणाऱ्या भालचंद्र धुर्वे (वय 50 वर्षे) यांची मुरकूटडोह जंगल परिसरात गोळी झाडून हत्या केली होती.
हेही वाचा - देवरीमधील स्टील कंपनीला आग, सात कामगार भाजले
याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत 10 नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत नक्षलींवर त्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. याबाबत पोलिसांना विचारले असता यावर सध्या अधिकची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
हेही वाचा - सट्टा व्यावसायिकाकडून १० हजारांची लाच घेणारा पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात