गोंदिया - जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकीत बिबट्याची कातडी जप्त केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बाक्टी या गावातील एका घरी बिबटची कातडी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. बाक्टी येथील मंगेश नंदलाल बडोले या व्यक्तीच्या घरात ही कातडी सापडली आहे.
दरम्यान, बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने व वन विभागाने मंगेश नंदलाल बडोले, विनोद जयगोपाल रुखमोडे (रा. कटंगधरा) आणि खुशाल वालदे ( रा. केसलवाडा) या तिघांना अटक केली आहे. आरोपींना वन विभागाला सोपविण्यात आले असून वन विभागाने त्या 3 आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची वनकोठडीत रवानगी केली आहे.
वन विभागाचे अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या आरोपींनी कुठे आणि केव्हा शिकार केली याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्याकरिता आरोपींची कसून झडती घेण्यात येत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींविरोधात वन विभागाने वन्यजीव अधिनियम (सं) अधिनियम १९७२ कलम २(१६), २(३६), ९, ३९, ४४, ४८ (अ), ४९(ब), ५०, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघाच्या कातडीच्या सहाय्याने झडती, पैशाचा पाऊस, कजली आदी प्रकार करण्यात येतात. त्याकरिता या कातडीचा वापर होणार होता. मात्र, या प्रकारची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्याकरिता विनोद रुखमोडे आणि रविंद्र वालदे हे मंगेशच्या घरी जमले होते. याप्रकरणी धाड टाकून नंतर हे प्रकरण वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यात नागझिरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आहे. वाघ आणि इतर वन्यजीवांच्या रक्षणाकरिता वन आणि वन्यजीव विभाग जीव तोडून काम करत आहे. घनदाट जंगल देखील वाढत आहे. याचाच फायदा काही वन्यजीवांची शिकार करणाऱ्या तस्करांनी घेतला आहे. अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि देवरी या तालुक्यांत यापूर्वी अनेकदा वाघ, बिबट आणि इतर वन्यजीवांच्या अवयवांसह तस्करांच्या मुसक्या वन विभागाने आवळल्या होत्या.