गोंदिया - आमगाव तालुक्यातील रिसामा परिसरातील तलावात हजारो मासे मृत पडल्याचे सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्याचे तब्बल २ ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तलावात कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकल्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा अंदाज नागरिक आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या ठेकेदारांकडून वर्तवला जात आहे.
तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. या तलावामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला. सुरेंद्र आणि माणिक महापात्र ही भावंडे गेल्या अनेक वर्षांपासून रिसामा परिसरातील तलाव लिलावाने भाडे तत्वावर घेत आहेत. ते तलावात मत्स्य व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. अनेक अडचणींवर मात करून ते हा व्यवसाय करतात. मात्र, गुरुवारी सायंकाळी तलावाशेजारील काही लोकांनी त्यांच्या तलावातील मासोळी मरण पावल्याचे त्यांना सांगितले. ते पहाटे या ठिकाणी आले असता त्यांना रात्रभरात संपूर्ण तलावातील हजारो मासे मृत पावल्याचे निदर्शनास आले. यानंतर सकाळी ५ वाजल्यापासून तलावातील मृत मासे काढण्याचे काम सुरू झाले. यात अंदाजे ३५ ते ४० क्विंटल मासे मृत पावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापात्र भावंडांचे २ ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणी सुद्धा दुषित झाले आहे.
तलावातील पाणी साठवण क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणीसाठा असून सुद्धा मासे अचानक मरण पावल्यामुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी अजून पर्यंत याठिकाणी भेट दिलेली नाही. घटनेची चौकशी करुन नुकसान भरपाई मिळावी, यासाठी महापात्र भावंडांनी मत्स्य विभागाकडे विनंती केली आहे.