गोंदिया - प्रशासनाने तेंदुपत्ता संकलनाला मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील शेकडो मजुरांना काम मिळाले आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासुन हातावर हात ठेवून बसलेल्या हजारो मजुरांना काम मिळाले. या कामातून हजारो कुटुंबांच्या चुली पेटणार असुन त्यांना आर्थिक उभारी मिळाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासुन रिकाम्या बसलेल्या हजारो मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न सध्या तरी सुटला आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणुन गेल्या २२ मार्चपासुन देशात व राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. लॉकडाउनमुळे परराज्यात, जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले येथील मजुर आता परतले आहेत. परंतू लॉकडाउन असल्यामुळे सर्वच कामे गेल्या दोन महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे नागरिक रिकाम्या हाताने घरीच बसले होते. मात्र प्रशासनाने तेंदूपत्ता संकलनाला मंजुरी दिली आहे.
तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांकडून सत्तर पानाचा एक पुडका तयार करून शंभर पुडके २२० रूपयेप्रमाणे खरेदी केले जाते. तसेच नंतर यावर बोनस पण दिला जातो. यामुळे हंगामी तेंदुपत्ता संकलनाच्या कामामुळे गरीब मजुरांना तेवढाच आर्थिक लाभ मिळत असतो. मात्र, तेंदुपत्ता संकलनासाठी या मजुरांना जंगलात फिरावे लागते. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे या मंजूरांचा जीव धोक्यात असतो. म्हणून तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तेंदुपत्ता संकलन मजुर करीत आहेत.