गोंदिया - देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा असून काही ठिकाणी काळाबाजार होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील महागावातील सरपंच प्रमोद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली येथील शिंपी संघटनेने पुढाकार घेतला. संघटनेकडून 3 हजार मास्क तयार करून गावातच त्यांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा... Coronavirus : मंत्रालयात महापालिका कर्मचाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण फवारणी
शिंपी संघटनेकडून सध्या मास्क बनवण्यात येत आहेत. गावातील पंधराहून अधिक शिंपी बांधवांनी जिल्हा परिषद शाळेत एकत्र येत मास्क बनवणे सुरू केले आहे. गावातील नागरिक देखील सार्वजनिक ठिकाणी आता मास्क घालून वावरताना दिसत आहेत. तसेच गावाला आणि देशाला कोरोना व्हायरसपासून वाचवण्याचा आणि लढण्याचा संदेश देत आहेत.