गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने तसेच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही विद्यार्थी व शिक्षक कोरोनाग्रस्त आढळले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 5 वी ते 9 वी व 11वीचे वर्ग 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, इयत्ता 10 वी व 12 वीचे वर्ग सुरू राहणार असल्याचेही त्या आदेशात म्हटले होते. दरम्यान, इयत्ता 10 वी व 12 वीचे 16 विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आमगाव येथील जिल्हापरिषद माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेत एक मुलाची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 12 वीचा विद्यार्थी हा पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील 40 विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये वर्ग 10 वीचे 14 विद्यार्थी आणि वर्ग 12 वीचे 2 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यानंतर आज (दि. 25 मार्च) उर्वरित 140 विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांची चाचणी करण्यात येणार आहे.
539 सक्रिय रूग्ण
जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आज 50 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या 15 हजार 242 एवढी झाली आहे. तर 41 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आजपावेतो 14 हजार 516 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यात 539 सक्रिय रुग्ण असून त्यातील 400 रुग्ण सौम्य लक्षणाचे असल्याने घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्हा प्रयोगशाळेकडे 531 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आरोग्य प्रशासनाने आजपर्यंत 1 लाख 80 हजार 742 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यातील 1 लाख 61 हजार 477 व्यक्ती निगेटिव्ह आढळले आहेत तर 15 हजार 242 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आजचे बाधित
जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आज 50 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील - 21, तिरोडा - 12, गोरेगाव - 1, आमगाव - 8, देवरी - 2, सडक अर्जुनी - 2 व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा - ..अन् तहसीलदारांनी हाकल्या बैलजोड्या, गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ‘अशीही एक रेती चोरी’