गोंदिया - रेल्वे स्थानकावर गाडीमध्ये चढत असताना गाड़ीच्या खाली पडत असलेल्या एका महिलेला सुरक्षा रक्षकांनी वाचवले. ही घटना बुधवारी गोंदिया रेल्वे स्थानकावर सकाळी १०.४० च्या सुमारास घडली.
गाडी क्रमांक १२४१० गोंडवाना एक्सप्रेस गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर आली होती. या दरम्यान रायपुर ते दिल्ली प्रवास करणाऱया २ महिला प्रवाशांपैकी सरिता बानो (वय ३८) या पाणी भरण्यासाठी खाली उतरल्या. मात्र गाडी सुटत असल्याने त्या धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने त्या खाली पडल्या. काही क्षणातच त्या रेल्वेगाडीच्या खाली जात असताना रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक जी. आर. कोतळे यांनी तत्परता दाखवित महिलेला बाहेर खेचले. यामुळे त्या महिलेचा जीव वाचविण्यात यश आले.
दरम्यान, महिलेच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढच्या गाडीने त्यांच्या गावाकडे पाठविण्यात आले.