गोंदिया - हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका तांदुळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापणी कलेलं धान्य पाण्यात भिजल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पूर्व विदर्भ हा धानाचे कोठार म्हणून संबोधला जातो. तसेच गोंदिया जिल्हा हा तांदुळ उत्पादनात अग्रेसर आहे. या जिल्ह्यात सर्वात जास्त क्षेत्रात भाताचे पीक काढण्यात येते.
या वर्षी पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरणी, लागवड उशिरा झाली. त्यानंतर महापूर आला. यामध्ये अनेकांची शेती वाहून गेली. आता शेतकरी सावरत असताना पुन्हा बंगालच्या उपसागरात तयात झालेल्या वादळामुळे हवामानात बदल झाला आहे.
या वर्षी किमान उत्पादन खर्च निघेल, या अपेक्षेत शेतकरी होता. भारी वाणाच्या धान्याची कापणी करून मळणीसाठी शेतकऱ्यांनी शेतात धान ठेवले होते. मात्र काल आलेल्या अवकाळी पावसाने कापून ठेवलेले धान्य पाण्यात भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे.