गोंदिया - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा देशासह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यालगत असलेल्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सोबतच गोंदिया जिल्ह्यातील २३ कंटेनमेंट झोनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर आहेत. याच पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत 85 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कंटेनमेंट झोन तसेच इतर ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी खबरदारी व उपायोजनाचा म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 85 खाटांची व्यवस्था केली आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 60, तर महिला पोलिसांसाठी 25 खाटांची व्यवस्था आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सहयोग रुग्णालय यांच्या ४ वैद्यकीय चमूंमार्फत ई.सी.जी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी सुरू आहे. आतापर्यंत १०४ अधिकारी व १ हजार २३२ पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी या टीममार्फत करण्यात आलेली आहे. तर, उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे.