गोंदिया- आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण व जनजागृती या आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्तीच्या काळात जनजागृती आणि दक्षता या शस्त्रांचा वापर करून पूर परिस्थिती आणि कोरोनावर मात करता येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पूर परिस्थतीत शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांची उपस्थिती होती.
राज्य आपत्ती दल, नागपूर तुकडी क्र.1 चे टिम कमांडर प्र. सहाय्यक समादेश सुरेश कराळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस उपनिरिक्षक अजय काळसरपे, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता.
यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पूर परिस्थिती, असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्याना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेऊन कार्य करावे लागेल. शोध व बचाव कामात जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाच्या रंगीत तालिमचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तीवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. यावर्षी जिल्ह्यातील जलाशये, धरणे व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पूर परिस्थीतीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे आहे. त्याकरिता नियुक्त केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून पूर परिस्थितीची माहिती तत्काळ वरिष्ठांना देणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळेस नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती नसल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पूर परिस्थितीत जिवीत व वित्तहानी कमी करण्यास मदत होईल.
कोरोनावर प्रशासन आणि नागरिकांनी मिळून मात करणे शक्य होईल. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करुन दक्षता घेणे महत्वाचे आहे. पुराचे प्रकार, पूर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पूर्व सूचना, हवामान खात्याचे अंदाज याबाबत या कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली. शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाऱ्या आवश्यक दक्षतेच्या संदर्भात अनुभवही सांगण्यात आले. तसेच घरगुती टाकाऊ वस्तुपासून फ्लोटींग डिव्हाईस तयार करुन प्रात्यक्षिके दाखविले.
प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यावर गोंदिया तालुक्यातील खडबंदा जलाशय येथे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना रंगीत तालिमेतून प्रशिक्षण देण्यात आले. खडबंदा जलाशयातील पाण्यात रबर बोट व इंजिनचे प्रशिक्षण, शोध व बचाव करताना पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणे, पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग आदीचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.