जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे मोठया प्रमाणात घरांची पडझाड झाली आहे. हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पूरग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यापासून एकही पूरग्रस्त वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. वस्तुनिष्ठपणे आणि कुठलाही भेदभाव न करता सर्व्हेक्षण करुन मदत द्यावी, असे निर्देश प्रफुल पटेल यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हयात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका बसलेल्या गोंदिया व तिरोडा तालुक्यातील सायटोला, मुरबाडा, महालगांव, लोधीटोला, धापेवाडा, देवरी, किन्ही, तेढवा, कासा, बिरसोला, भाढ्याटोला इ. गावांची पाहणी करून पटेल यांनी तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला. पटेल यांनी पुरामुळे पडझड झालेल्या घरांची पाहाणी केली तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात धान पिकांची पाहाणी केली.
हेही वाचा-कंगणाबाई शुद्धीत नाही, तिला सिरियसली घेऊ नका - प्रफुल पटेल
नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्यातून गावातील कोणत्याही व्यक्तीचे नाव सुटू नये, याची दक्षता घ्यावी. नुकसानग्रस्तांच्या याद्यांचे तलाठी, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांनी चावडी वाचन करावे. त्यामुळे एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पुरामुळे ज्यांच्या घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल देण्यात यावे. ज्यांच्या घरांची अंशतः पडझड झाली आणि घरात पुराचे पाणी साचल्याने नुकसान झाले, त्यांना खावटी मदत आणि नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना पटेल यांनी दिले.
गोंदिया जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पुराचे पाणी शेतांमध्ये गेले होते. शेतात मोठ्या प्रमाणात वाळू तसेच माती वाहून आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जनावरांसाठीच्या चाऱ्याचे देखील नुकसान झाले आहे. ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पटेल यांच्याकडे केली आहे.