गोंदिया – जिल्ह्यात एकाच दिवशी जनावरांच्या अवैध वाहतुकीप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाहनात कोंबून जनावरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तेढा येथे दोन व तुमसर येथे एक असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ९० हजार रुपयांचे किमतीच्या जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे.
पोलिसांनी आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास तेढा येथे कारवाई केली आहे. पोलिसांनी संशयावरून एमएच ३४ बीजी ४६३८ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. यावेळी पोलिसांना वाहनात निर्दयतेने जनावरे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी ३० हजार रुपयांच्या जनावरांची सुटका केली. तर दुपारी दीडच्या सुमारास एमएच ३४ बीजी ५००४ क्रमांकाच्या वाहनाची तेढा येथे तपासणी केली. याठिकाणीही जनावरांची बेकायदेशीपरणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. याजनावरांची किंतम एकूण ३० हजार रुपये आहे.
तुमसर येथे केलेल्या कारवाईत एमएच ३५ एजे. ०९४० बोलेरो पिकअपमधून नेण्यात आलेल्या जनावरांकरीता चारापाण्याची सोय नसल्याचे पोलिसांनी आढळले. कोंबलेल्या अवस्थेत ही जनावरे वाहनातून नेण्यात येत होती. सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांनी ही कारवाई केली. तिन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.