गोंदिया - रेल्वे सुरक्षा दलाच्या टॉस्क फोर्सने रेल्वेतून दारू तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून 17 हजार 50 रूपये किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. निखिल वासुदेव चावडा व विक्रम उर्फ विक्की शंकरलाल थलानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रेल्वे सुरक्षा बलचे आयुक्त आशुतोष पांडे यांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी टास्क फोर्स कामाला लावली आहे. गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात टॉस्क फोर्सचे उपनिरीक्षक विनित मेश्राम, जी. आर. मडावी, पी. दलाई, नासिर खान, सुधाकर बोरकर, उपनिरीक्षक एम. पी. राउत गस्तीवर असताना दोन युवक हातात जड बॅग घेऊन फलाट क्र. ३ व ४ वर संशयास्पद दिसून आले.
दोन्ही युवकांची विचारपूस केली असता, निखिल वासुदेव चावडा व विक्रम उर्फ विक्की वासुदेव थलानी (रा. भाटापारा जि. बलौड छत्तीसगड) असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बॅगमध्ये सामान असल्याचे सांगितले. परंतु, बॅगची तपासणी करीत असताना त्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू झाल्या. यावरून टॉस्क फोर्सने दोन्ही बॅग उघडून पाहिल्या असता 17 हजार 50 रूपये किंमतीची विदेशी दारूच्या बॉटल दिसून आल्या. दोन्ही आरोपी छत्तीसगड राज्यातून गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करीत असल्याची बाब समोर आली. यावरून दोन्ही आरोपीविरूद्ध गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.