गोंदिया - मान्सूनच्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात आज ५ वाजेपासून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. देवरी तालुक्यातील एका तरुणाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील सीलापूर गावातील विशाल आत्माराम रहिले (19 वर्ष) हा आपल्या शेतावर शेळ्या घेऊन गेला होता. मात्र, सायंकाळी घरी परत येत असताना त्यांच्यावर वीज कोसळली व तो जखमी झाला. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ १०८ रुगवाहिकेला फोन केला व त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करून देवरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत मुलाच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.