गोंदिया - जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग यांसह सर्व विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. मागील सहा दिवसांत जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच उपचारातून बरे होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
जिल्ह्यात एकूण ६९ कोरोना बाधितांपैकी ६८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या फक्त एक बाधित असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आज आणखी चार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चौघेही गोंदिया तालुक्यातील आहेत. सद्या शेवटचा एकच पॉझिटिव्ह असल्याने जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात एकूण ६९ रुग्ण सापडले. आता यातील ६८ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून १०९७ व्यक्तींचे स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
त्यामधील ६९ रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. प्रयोगशाळेकडे अद्याप ३२ अहवाल प्रलंबित आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण २४ कंटेन्मेट क्षेत्र आहेत. यामध्ये गोंदिया तालुका - ७, सालेकसा - २, सडक अर्जुनी - ६, गोरेगाव - ३, तिरोडा - १, अर्जुनी मोरगाव तालुका - ५ आदींचा समावेश आहे. सद्या एकूण ३,९८७ व्यक्ती अलगीकरणात आहेत.