गोंदिया - नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली डीव्हीजन कमिटीच्या वतीने देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मगरडोह परिसरात बॅनर लावल्याने मोठी खळबळ उडाली. बॅनरमध्ये २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करीत नक्षल नेता चारु मुजूमदार व कन्हाई चॅटर्जीच्या विचारांना आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच नक्षल्यांच्या स्मृतीनिमित्त गावात कार्यक्रम आयोजन करण्याचे अवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अतिसंवेदनशिल आदिवासी नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या मगरडोह या परिसरात काही दिवसांपूर्वी सशस्त्र दुरक्षेत्र कॅम्प पोलिसांकडून लोकांना रेशन कार्ड, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ येथील लोकांना मिळवून दिला आहे. त्याच प्रमाणे दोनशे कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटपही करण्यात आले.
सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह कॅम्पच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एकूण चौदा गावातील विकास व्हावा, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेता याव्या या अनुषंगाने येथे कार्यक्रम घेण्यात आले होते. असेच कार्यक्रम परिसरातील गावात घेण्यात आले. मात्र, नक्षलवाद्यांनी या कार्यक्रमाचा विरोध दर्शवित मंगळवारी या परिसरात बॅनर लावण्यात आले आहे.