गोंदिया- कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी संचारबंदी लागू आहे. त्याचप्रमाणे वयोवृद्ध लोकांनी बाहेर निघायचे नाही आदेश आहेत. मात्र, शासकीय कामांसाठी अनेक वयोवृध्द नागरिक शासकीय कार्यालयात येतात. शासकीय कर्मचारी व अधिकारी त्यांना वारंवार चकरा मारायला लावण्याच्या उद्देशाने त्यांचे काम न करता उद्या या, परवा या अशी टोलवाटोलवी करतात. ही बाब गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी मंगळवारी तहसील कार्यालय गाठत तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनावले.
गोंदिया तहसील कार्यालयात अनेक वयोवृध्द शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी येतात, मात्र कर्मचारी त्यांना दाद देत नाही. या शिवाय शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या समस्येकडेही दुर्लक्ष करत असतात. कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे पाहून व वयोवृद्ध लोकांना कार्यालयात बोलावून तासनतास उभे ठेवले जाते, असे वयोवृद्ध नागरिकाने सांगितल्यानंतर आमदारांचा पारा चांगलाच चढला व हे सगळे बघून अग्रवाल यांनी अधिकारी व कर्मचा-यांना धारेवर धरले.
शेतकरी व गोरगरिब जनतेला कोणताही त्रास न देता, त्यांची कामे तातडीने मार्गी लावा, कामचुकारपणा चालणार नाही, अशा इशाराही दिला.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वयोवृद्ध लोकांनी घरा बाहेर पडू नये, असे आदेश सरकार देत आहे. मात्र,सरकारी कार्यलयात काम करणारे कर्मचारी व अधिकारी सरकारच्या आदेशाचे पालन न करता वयोवृद्ध लोकांना शासकीय कार्यालयात वारंवार बोलवत असल्याचे चित्र गोंदिया येथील तहसील कार्यालयात दिसल्याने अग्रवाल यांनी रोष व्यक्त केला.