गोंदिया - निसर्ग अभ्यासक आणि पक्षी मित्र मारुती चितमपल्ली यांच्या 'केशराचा पाऊस' या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आस्वाद कार्तिकी पौर्णिमेनिमित्त निसर्ग प्रेमींना घेतला. यावेळी चितमपल्ली यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. निमित्त होते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पौर्णिमा महोत्सव या कार्यक्रमाचे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बोदलकसा या ठिकाणी हा सोहळा पार पडला.
पर्यटकांसाठी अभिनव उपक्रम
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने डिसेंबर २०१८ पासून दर महिन्याच्या पौर्णिमेला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पर्यटकांना वन्यजीव आणि निसर्गाविषयी गोडी निर्माण व्हावी या याचा प्रमुख उद्देश आहे. याच्या माध्यमातून कला, संस्कृती, साहित्य यांचा परिचय पर्यटकांना करुन दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून बोदलकसा येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा - अल्पवयीन खून प्रकरण; कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांचा कँडल मार्च
चितमपल्लींच्या सहवासात उलगडला 'केशराचा पाऊस'
यावेळी निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या केशराचा पाऊस या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. तसेच, लेखिका कांचन प्रसाद यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी चितमपल्ली यांनी या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला. मेळघाट येथे होणाऱ्या केशराच्या पावसाचा अनुभव चितमपल्लींनी प्रेक्षकांना सांगितला. त्यांच्या या अनुभवाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
काय असतो 'केशराचा पाऊस'
मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या आयुष्याची अनेक वर्षे निसर्ग अभ्यासात खर्ची घातली. याच दरम्यान त्यांना मेळघाटातील केशराचा पाऊस अनुभवता आला. हा अनुभव सांगताना चितमपल्ली हरखून गेले होते. मेळघाटात डिसेंबरच्या महिन्यात तिथल्या झाडांना फुले येतात. त्या फुलांवर दव पडते. त्या फुलांचे केशर हवेत जाते आणि दवासोबत ते आपल्या अंगावर पडते. हा अनुभव आपण अंगावर पांढरी शाल घेऊन अनुभवला. तेव्हा माझी शाल केशरी रंगात न्हाऊन निघाल्याची आठवण मारुती चितमपल्ली यांनी सांगितली.
हेही वाचा - अनोळखी व्यक्तीचा रितीरिवाजाप्रमाणे केला अंत्यविधी; प्रतिसाद फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी
गोंदियाशी चितमपल्लींचे जुने नाते
मारुती चितमपल्ली यांनी गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्यात बरीच वर्षे मुख्य वनरक्षक म्हणून काम केले आहे. यावेळी त्यांनी आपले निसर्ग अभ्यासाचे काम सुद्धा केले. गोंदियाशी त्यांचा हा ऋणानुबंध लक्षात घेऊन लोकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली