गोंदिया - जिल्ह्याला गारा व अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. यामध्ये रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पांढरी, नवेगावबांध, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्याला बसला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मुग, तुर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि गुरूवारी सायंकाळच्या सुमारास गारा व अवकाळी पावसााने हजेरी लावली. याचा मोठा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरला आहे.
रब्बी पिकासह, मिरची आणि टरबुजच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले. मागील १५ दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची पिके पुर्णपणे भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पिक गमाविण्याची वेळ आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मिरची आणि टरबुजाच्या वाड्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी टरबुज आणि मिरची विदेशात सुध्दा पाठवली जाते. सध्या मिरचीचा पहिला तोडा सुरू असुन शेतकऱ्यांनी तोडणी केलेली मिरची वाळवण्यासाठी ठेवली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली मिरची भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टरबुजाचे पीकसुध्दा निघण्याचा मार्गावरून असुन त्याला सुध्दा गारपीठ आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हाती आलेले पिक गमावण्याची वेळ आली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रब्बीतील पिके पुर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे बळीराजा चिंतेत आहे.