गोंदिया- आज ८ मार्च, जागतिक महिला दिवस. या दिवशी अनेक उपक्रम राबवून महिला दिवस मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर शहरातील महिलांनी 'एक दिन सायकल के नाम' या उपक्रमांतर्गत सायकल चालवत मोठ्या उत्साहाने महिला दिवस साजरा केला. आज सकाळी जयस्तंभ चौकातून या उपक्रमाला सुरूवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
'जेसीआई गोंदिया राईस सिटी' ने ८ जून २०१७ ला 'एक दिन सायकल के नाम' या मोहिमेला सुरवात केली होती. नेमके आज जागतिक महिला दिनी या मोहिमेला १४३ आठवडे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे, या आठवड्याला महिला दिन विशेष ठरवून शहरातील शेकडो महिलांनी सदर उपक्रमात सहभाग घेत महिला दिवस साजरा केला. या उपक्रमाद्वारे प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालविणे, भविष्यात डिझेल, पेट्रोलची बचत, निरोगी आरोग्य व पर्यावरण संरक्षणाबाबत संदेश देण्यात आला.
शहरातील जय स्थंभ चौकातून या सायकल मोहिमेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या पत्नी सविता विनोद अग्रवाल व नगर सेविका भावना कदम उपस्थित होत्या. त्यांनी देखील सायकल चालवत महिलांना प्रोत्साहित केले. सायकल मोहीम शहर पोलीस स्टेशन, गोरेलाल चौक, नेहरू चौक होत सुभाष गार्डन येथे संपन्न झाली. यावेळी सर्व महिलांनी आम्ही प्रत्येक रविवारी सायकल चालवू व या मोहिमेमध्ये सहभागी होऊ, अशी ग्वाही दिली.
हेही वाचा- Women's Day : गोंदिया एसटी आगारात महिला राज, 45 महिला कार्यरत