गोंदिया - दोन ट्रकची समोरासमोर धडक होउन देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भीषण अपघात झाला आहे. ही अपघाताची घटना आज दुपारी झाली आहे. या अपघातात वाहनचालकाचा घटनास्थळी मृत्यु झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर देवरी येथील चिंचगड टी पॉईंट चौकात दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. नागपूरकडून रायपूरकडे जाणारा मालवाहू ट्रक (सीजी८ ऐई २११०) आज (२९ ऑक्टोबर) दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास जात होता. यावेळी विरुद्ध दिशेने रायपूरकडून नागपूरकडे लोखंड घेऊन जाणारा ट्रक नागपूरकडे जात होता. दुचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. हा ट्रक नागपूरकडुन येणाऱ्या ट्रकला धडकला. या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर ट्रेलरवरील लोखंड रस्त्यावर पडले असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीवेळेसाठी विस्कळित झाली.
पोलिसांनी घटनास्थळी अपघात झालेल्या ठिकाणावरील ट्रकमधील लोखंड जेसीबीच्या मदतीने बाजूला काढले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला. चालकाचा मृतदेह हा शवविच्छेदन करण्यासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.