गोंदिया - इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला जोरदार विरोध केला आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी संघटना आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी आज 11 डिसेंबरला देशभरातील लाखो आयएमए डॉक्टर संपावर जाणार आहेत. आज गोंदियातील दवाखाने, क्लिनिक, हॉस्पिटलमधील ओपीडी बंद आहेत. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत डॉक्टरांचा संप असणार आहे. त्यामुळे या काळात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा उडण्याची शक्यता आहे.
सेंट्रल कौऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन (सीसीआयएम) यांनी 20 नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढले असून त्यानुसार बीएएमएस डॉक्टर्सना शस्त्रक्रियांचे (सर्जरी) अधिकार दिले जाणार आहे. मात्र, हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून इंडियन मेडिकल असोसिएशन आज शुक्रवारी खासगी दवाखाने बंद ठेवून विरोध प्रदर्शन करत आहे. यासाठी गोंदिया शहरातील चौकात डॉक्टरांनी या निर्णयाविरोधात पत्रकं वाटली.

सीसीआयएमने काढलेल्या अध्यादेशानुसार बीएएमएस डॉक्टर्सना 58 प्रकारच्या शस्त्रक्रियांची अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी बीएएमएस डॉक्टर्सना प्रशिक्षण पुरवले जाणार आहे. मात्र, एमबीबीएसमध्ये विद्यार्थ्यांना साडे चार वर्षे शरीर रचना विज्ञान, शरीर विज्ञान, जैन रसायन, विकृती विज्ञानाचे गहण अध्ययन करविले जाते. शल्यक्रिया शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची काटेकोर तपासणी केली जाते. तर बीएएमएस डॉक्टर्सना आयुर्वेदशी संबंधित विषय शिकवले जात असून हे पूर्णपणे वेगळे विज्ञान आहे, असे आंदोलक डॉक्टरांनी सांगितले. अशात आता बीएएमएस डॉक्टर्सना शल्यक्रियेचे अधिकार दिल्यास रुग्ण संभ्रमावस्थेत येतील. तसेच हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळणारा असल्याचे आयएमएचे म्हणणे असून ते बीएएमएस डॉक्टर्सना शल्यक्रियेचा अधिकार देणाऱ्या अध्यादेशाचा विरोध करत आहेत. यासाठी आज शुक्रवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वच खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत.