गोंदिया - शून्य रॉयल्टी उपलब्ध नसतानासुद्धा परराज्यातून महाराष्ट्रात अनेक वाहने गौण खनिज घेऊन येतात. असेच रेती भरून परराज्यातून येणार्या एकूण 6 टिप्परला पकडून 16 लाख 62 हजार रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे. ही कारवाई 16 फेब्रुवारीला रात्री 12 ते काल पहाटे 4 वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
हेही वाचा - लाच घेताना पोलीस हवालदारासह पोलीस निरीक्षकही एसीबीच्या जाळ्यात
महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली. मध्य प्रदेशातून रेती भरलेले एकूण 6 टिप्पर खैरलांजी-तिरोडा मार्गाने येत होते. दरम्यान उपविभागीय अधिकारी नाष्टे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार प्रशांत घोरुडे तथा महसूल विभागाचे इतर अधिकारी व पोलीस प्रशासनाने कारवाई करून टिप्पर जप्त केले व ते तहसील कार्यालय परिसरात जमा केले. प्रत्येकी 5 ब्रास रेती व एका वाहनावर दंड, असा 2 लाख 77 हजार रुपये दंड याप्रमाणे एकूण जप्त करण्यात आलेली रेती व 6 टिप्परवर एकूण 16 लाख 62 हजार रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या टिप्परच्या मालकांची नावे व टिप्पर क्रमांक असे :
सौरभ ठामेंद्रसिंह चौहान (रा. तिरोडा) याचा टिप्पर क्रमांक एमएच-36/एए-2358, सौरभ ठामेंद्रसिंह चौहान (रा. तिरोडा) याचा टिप्पर क्रमांक एमएच-36/एए-1251, सुनील बचवानी (रा. तिरोडा) याचा टिप्पर क्रमांक एमएच-40/बीजी-0540, गणेश देशमुख (रा.ता. हिंगणा, जिल्हा नागपूर) याचा टिप्पर क्रमांक एमएच-40/बीएल-4362, हरिष अशोक बांदे (रा. नागपूर) याचा टिप्पर क्रमांक एमएच-40/बीजी-4452 व उमेश शहारे (रा. दाभा, ता.जि. भंडारा) याचा टिप्पर क्रमांक एमएच-36/एफ-3573 यांचा समावेश आहे. सदर सर्व टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
0 रॉयल्टी उपलब्ध नसल्यामुळे वाहने जप्त
परराज्यातून आलेला वाळूचा साठा व निर्गतीबाबत कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाने 5 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने परराज्यातून जे गौण खनिज येतात, त्यामधील रॉयल्टीची 10 टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानाला जमा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर 0 रॉयल्टी प्राप्त करून त्यावर वाहतूक करणे अपेक्षित आहे. मात्र, बरीच वाहने परराज्यातून महाराष्ट्रात येत असतात, 0 रॉयल्टी त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे ते वाहने जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आलेली आहेत.
हेही वाचा - गोंदिया : घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना अज्ञातांनी लावली आग