गोंदिया - जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, अवकाळी पाऊस, अवैध दारु विक्री, कोरोना संसर्ग, वाहतूक नियम कारवाई, समृद्धी महामार्ग, पोलिसांची कारवाई या घटनांनी 2021 मध्ये गोंदिया जिल्हा चर्चेत राहिला आहे.
- जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचा कार्यकाळ २०२० जूनला समाप्त झाला. त्यानंतर निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर ढकलण्यात आले. तेव्हा मात्र २१ डिसेंबर २०२१ ला या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र या निवडणुकीच्या चर्चा जिल्ह्यात मागील वर्ष भरापासून सुरु होत्या. या निवडणूकीला घेऊन जिल्ह्यात प्रत्येक पक्षांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होताच या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली, असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत होते. या निवडणूकाही यावर्षी चांगल्या चर्चेचा विषय ठरल्या.
- दारु विक्री : जिल्ह्यात वर्ष भरात मद्य शौकिनांची भर पडली आहे. या वर्षी गोंदिया जिल्ह्यात वाईनची ७ हजार ५५२ लिटर विक्री झाली आहे. तर ५४ लाख ६६ हजार ३१५ लिटर देशी दारू, १ लाख १२ हजार ७६५ लिटर विदेशी दारू, ५ लाख ६२ हजार ७२४ लिटर बियर विक्री करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात वाईन २०२०-२१ च्या तुलनेत सन २०२१-२२ या वर्षात २ हजार ५५ लिटर ने मागणी वाढली आहे.
- अवकाळी पावसाने शेतकरी संकटात : जिल्ह्यात यावर्षी प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लागलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले. खरीप हंगामातील पिकांवर अवकाळी पाऊस व वातावरण बदलामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला लागवडीचा खर्च देखील भरून निघालेला नाही. वर्षभर राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करून असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाने कहरच मांजवले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच लागत नाही. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात धानासह तूर, लाखोळी, गहू, हरभरा, जवस, करडई, या पिकांची लागवड केली जाते. मात्र यंदा जिल्ह्यात २४३३४ हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले होते. या पैकी प्रत्यक्षात २३०४३ हेक्टर विविध पिकांची लागवड करण्यात आली.
- जिल्ह्यात कोरोनाची दहशत : नियंत्रणात असलेला कोरोना आता पुन्हा फोफावत असून मागील आठवड्याच्या तुलनेत या आढवड्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पटीने वाढत असल्याचे दिसत आहेत. जिल्हयात सध्या १२ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शिवाय कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
- वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई : वाहनधारकांवर नियमांचे उल्लंघन केल्यास नवीन तरतुदीनुसार दंडाची आकारणी केली जात आहे. हेल्मेट आवश्यक असले तरी विनाहेल्मेट गाडी चालविली जाते. जिल्ह्यात वाहनांची शर्यत लावणाऱ्या ५०६ टवाळखोरांवर ५ लाख ६ हजारांचा दंड आकारण्यात आला. वाहतुक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्हा वाहतूक शाखेने या वर्षात १ जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत २४ हजार ९८६ वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांना तब्बल ५५ लाख ६५ हजार १०० रूपयांचा दंड ठोठावला.
- समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा आता नागपूर गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार नागपूर ते गोंदिया दरम्यानच्या विस्तारीकरणासाठी अभ्यास करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती आली आहे. नागपूर ते गोंदिया असा साधारणत: १५० किमी महामार्ग असेल. हे विस्तारीकरण झाल्यास मुंबई ते गोंदिया अंतर काही तासांत पार करणे शक्य होणार आहे.
- लाचखोरी विरोधात कारवाई : सन २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण ११ कारवाई केली आहेत. यामध्ये १३ लाचखोरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विभागनिहाय आकडेवारी बघितल्यास ग्रामविकास विभाग आघाडीवर असुन, या विभागात सर्वाधिक ४ कारवाई करण्यात आले. तर ४ आरोपींना दणका देण्यात आला आहे.