गोंदिया - केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 61 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र मंगळवारी 26 जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या टॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला, तर संतप्त आंदोलकांनी देखील पोलिसांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान शेतकरी असे करूच शकत नाही, हे आंदोलन दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने हायजॅक केले होते का? याचा केंद्राने तपास करावा अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकरी आंदोलनावर दिली आहे.
नेमके काय म्हणाले गृहमंत्री?
शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच केंद्राकडून नवीन कृषी कायद्यांना मंजुरी देण्यात आली आहे. हे कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या 61 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. मात्र कालच या आंदोलनाला हिंसक वळण कसे लागले? शेतकरी कधीही असं करू शकणार नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. हे आंदोलन दुसरे कोणी हायजॅक केले आहे का याचा शोध घ्यावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.