गोंदिया - शहरात अवैध होर्डिंगचे प्रमाण वाढले आहे, मुख्य मार्ग, चौकात, उड्डाणपूलवर मोठमोठी होर्डिंग्ज लावलेले आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. नगरपालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगचा वाहनचालकांना त्रास होत असून, होर्डिंगमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
या अवैध होर्डिगवर लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे कारवाई टाळली जात आहे. नगरपालिकेने खासगी संस्थेला हे टेंडर दिले आहे. अवैधरित्या होर्डिंग लावण्यासाठी कंत्राटीवर काम दिल्यामुळे नगरपालिका अवैध होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी हात झटकत आहे.
शहरातील मुख्य मार्गावर तसेच चौका-चौकात ठिकाणी बॅनर होर्डिंग्ज लावले आहेत. येथे शासकीय-निमशासकीय रुग्णालय, शाळा, महाविद्यालय यांच्यावर ही मोठ मोठी होर्डिंग लावलेले आहेत. बॅनर्स होर्डिंगमुळे चौकातील रस्ते अरुंद झाले आहेत रस्त्याच्या कडेला लागलेले बॅनर्स, होर्डिग्स पालिकेच्या परवानगीशिवाय लावल्या आहेत की नाही? यावरही प्रश्नचिन्ह आहे. या दबावामुळे अवैधरित्या होर्डिंग लावणाऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
तसेच वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय पावसाळा सुरू झाला आहे. या काळात सुटणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग उडण्याची भीती आहे. पालिकेच्या संबंधित विभागाला तक्रारी करण्यास आल्या परंतु राजकीय नेत्यांच्या दबावामुळे अवैधरित्या लागलेल्या होर्डिंग्ज लावणाऱ्यावर अद्याप कारवाई करण्यास आली नाही. जेम तेम उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत व शाळा सुरू झाल्या आहेत. त्या परिसरात लावलेले अवैध होर्डिंगमुळे एखादा अपघात झाल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.