गोंदिया - गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आजही जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. खरीप पिकाबरोबर रब्बी हंगामही हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने सुर्यदर्शन दुर्लभ झाले. ढगाळ वातावरण कायम असताना गारवाही सुरू आहे. वातावरणात झालेल्या अचानक बदलाचा फटका लहान मुले, वयोवृध्द व्यक्तींना अधिक बसला आहे. सर्दी, ताप, खोकला अशा आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
हेही वाचा - महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री
दरम्यान, दोन दिवस ढगाळ वातावरण असताना पुन्हा शुक्रवारी आठही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या हरभरा, वाटाणा, तूर, लाख, लाखोरी, गहू यासह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. खरीप हंगामातही पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर आता रब्बी हंगामातही पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा धुसर झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. म्हणून शासन, प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतपिकांचे सर्वेक्षण करावे, आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'आरोपीलाही तशाच प्रकारच्या यातना देऊन फाशी द्या'