गोंदिया - येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात यासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी स्वयंप्रेरणेने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी येथे केले. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदार बांधवांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शनिवारी तहसील कार्यालय येथे दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा - 352 सखी मतदार केंद्र, चालणार महिला राज !
जिल्ह्यातील आठही तालुक्यात दिव्यांग मतदार बांधवांच्या रॅलीचे व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरात सकाळी 9 वाजता इंदिरा गांधी स्टेडियम ते जयस्तंभ चौक, गांधी चौक, मुख्य बाजार मार्गे रॅली इंदिरा गांधी स्टेडियम येथे समापन करत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आमगाव येथे सकाळी ११. ३० वाजता जिल्हा परिषद हायस्कूल ते रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालय तर देवरी येथे सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल ते तहसिल कार्यालय आणि सडक अर्जुनी येथे सकाळी 8 वाजता तहसिल कार्यालय ते शेन्डा रोड दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा - राज ठाकरेंच्या सभेवर पुन्हा पावसाचे सावट?
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित निवडणूक क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, फिरते विशेष शिक्षक, ग्रामसेवक व सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला.