गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जिल्हा परीषदेच्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु अद्यापही या धानाची उचल करण्यात आली नसल्याने आता विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेच्या वर्ग खोलीत धानाचे पोते आणि विद्यार्थी बाहेर अशी स्थिती सद्या पाहायला मिळत आहे.
इतक्या शाळांचा समावेश
गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होत असून यावर्षीचे रब्बीतील धान खरेदीवर गोदामा अभावी त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसू नये. यासाठी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांने उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शाळांच्या इमारती शाळा सुरू होईपर्यंत गोदाम म्हणून वापर करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील 17 आश्रमशाळा व 66 जिल्हा परिषदेच्या अशा तब्बल 83 शाळेत आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था यांच्या मार्फत तब्बल 1 लाख 55 हजार क्विटल धान साठवून ठेवण्यात आले.
शाळा सुरू करण्याची पालकांची मागणी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने 5 जुलै रोजी शाळा सुरू करण्याचे पत्र काढले, तर आदिवासी विकास विभागाने 26 जुलैच्या परिपत्रका नुसार 2 ऑगस्टपासून आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आश्रमशाळा व्यवस्थापनाचे दीर्घ काळापासून बंद असलेली शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु शाळाच्या इमारतींमध्ये धान साठविले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह निवासी शाळा कशी सुरू करावी, असा प्रश्न आश्रमशाळेतील प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर धान उचलून शाळा सुरु करण्याची मागणी पालक करत आहे.
शाळा प्रशासन चिंतेत
आता जिल्हा प्रशासनाच्या कार्याचा संताप आदिवासी संघटनेकड़ून व्यक्त केला जात आहे. गोंदिया जिल्हा प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून देण्यात आला आहे. आश्रमशाळांच्या इमारतीमध्ये खरेदी केलेले धान त्वरित खाली करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाला दिले. मात्र, यानंतरही धानाची उचल करण्यात आली नाही. मात्र विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? असा प्रश्न आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
हेही वाचा-राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही; शरद पवार-अमित शाह भेटीनंतर अंजली दमानियांचं ट्विट