गोंदिया - खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची होणारी लूट पाहता गोंदियातील गोरक्षण सेवा समितीने पुढाकार घेत ७५ खाटांचे कोरोना सेंटर सुरू केले. या सेंटरमधून ३१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. विशेष बाब म्हणजे या सेंटरमध्ये अद्यापही एकही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. समितीने सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत.
गोंदियामध्ये मागील दोन महिन्यापूर्वी दररोज ३०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी सरकारी व खासगी रुग्णालयातही रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. त्यावेळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांला घरातच विलगीकरणात राहण्याचा डॉक्टर देत होते. अशा रुग्णांपासून इतर लोकांना बाधा होऊ नये, या दृष्टीकोनातून हे सेंटर सुरू करण्यात आल्याचे राजेश व्यास (गोरक्षण सेवा समिती कोरोना सेंटर प्रमुख) यांनी सांगितले.
![कोविड सेंटरमध्ये सुसज्ज सुविधा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-07dec20-coronacenterstory-7204273_07122020183513_0712f_1607346313_43.jpg)
पुढे ते म्हणाले, की या कोरोना सेंटरमधून ३४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या समितीने या सेंटरमध्ये ४ बीएएमएस डॉक्टर, एक एमबीबीएस डॉक्टर, व एक एमडी डॉक्टर नेमण्यात आले. तर १७ परिचारिकांची नियुक्ती केली आहे . या ठिकाणी २४ तास रुग्णांची काळजी घेतली जात आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाताना पैसे द्यावे अशी कोणतीही अट या सेंटरने ठेवलेली नाही. मात्र तरीदेखील रुग्ण बरे होऊन घरी जाताना स्वेच्छेने शक्य तेवढी मदत करतात. त्यातून आणि लोकांकडून वर्गणीतून गोळा झालेल्या पैशांतून हे सेंटर मागील २ महिन्यांपासून चालविण्यात येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सेंटरमध्ये बाधित रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा आढाव घेतला होता. तसेच कोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या समितीचे कौतुक केले होते.
![अग्रसेन भवन गोंदिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-07dec20-coronacenterstory-7204273_07122020183513_0712f_1607346313_201.jpg)
या आहेत कोरोना सेंटरमध्ये सुविधा-
- कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना दोन वेळचा चहा, नाष्टा आणि दोन वेळचे जेवण मोफत दिले जात आहे.
- सोबतच रुग्णांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.
- दर महिन्याला डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसह आदी खर्च मिळून अंदाजे ८ ते १० लाख रुपयाची गरज सेंटरला भासत असते.
- रुग्णांनकडून महिन्याकाठी २ ते ३ लक्ष रुपयांची देणगीदेखील मिळत असते.
- तरीही सरकारकडून कुठलीही मदत न घेता लोक वर्गणीतून हे सेंटर चालविण्यात येत आहे.
- या सेंटरमध्ये गोंदियातील विकास मेडिकलच्यावतीने औषधे मोफत दिली जातात.
- विक्की गुलाटी यांनी या सेंटमधून कोरोनाचे रुग्ण घरून आणण्या-नेण्यासाठी २४ मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.गोरक्षण सेवा समितीकडून ३५०हून अधिक कोरोना बाधितांवर मोफत उपचार
जिल्ह्यात आजवर १२, ७४९ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सेंटर सुरू असल्याने कोरोनाचा संसर्ग थांबविण्याचे काम झाल्याचे व्यास यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की कोरोना सेंटरसाठी अग्रसेन भवनमध्ये संस्थेने मोफत जागा दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा ते रुग्णांसाठी ऑक्सिमीटर अशा विविध रुग्णांसाठी सुविधा आहे. डॉक्टर आशा अग्रवाल यांच्याकडून मोफत उपचार करण्यात येतात.
दोन महिन्यांत अनेकांनी कोरोना सेंटरसाठी मदत केली आहे. डॉ. मुक्तता सरसाटे म्हणाल्या, की हे कोरोना सेंटर सर्वच बाबतीत चांगले आहे. विलिनीकरणात घरी राहण्यापेक्षा हे चांगले आहे. स्वेच्छेने पैसे देऊ शकतात. त्यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे. कोरोना बाधित रुग्ण गुलाब पोतदार यांनी सांगितले, की रुग्णालयात भोजनासह इतर सुविधा आहेत. डॉक्टर व नर्सकडून दिवसभरात दहा वेळा तपासणी होते.