गोंदिया - कोरोनाचे थैमान जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासुन बचाव होण्याच्या उद्देशाने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी विकसीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत १ लाख ८ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य संचालनालयाकडे लसींची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप साठा जिल्ह्यात पोहोचला नाही. त्यामुळे, बुधवारी जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे.
आरोग्य संचालनालयाकडे २ लाख ७८ हजार ८०० लसींची मागणी नोंदविण्यात आली असून लस आल्यानंतरच पुन्हा लसीकरणाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज तब्बल पाचशेचा आकडा ओलांडला. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असताना प्रशासनावर देखील ताण वाढत चालला असून, त्याला नागरिकांची बेफिकीरवृत्तीही कारणीभूत आहे. कोरोनापासून लढणाऱ्या एन्टीबॉडी तयार करण्यासाठी लस विकसीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोनायोध्दे, वयोवृध्द आणि ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात देणे सुरू आहे. आरोग्य विभागाने ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याचे उद्यिष्ट निर्धारित केले आहेत. त्यादृष्टीने काम सुरू आहे. जिल्ह्यातील निर्धारित केलेले लक्ष्य पुर्ण व्हावे, याकरिता आरोग्य यंत्रणा जीव तोडुन काम करत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करता यावे, याकरिता आरोग्य विभागाने वरिष्ठांकडे लसींची २ लाख ७८ हजार ८०० डोजेसची मागणी केली. मात्र अद्यापही साठा पोहोचला नसल्यामुळे आज सर्वच केंद्रावरील लसीकरण थांबले आहे. नागरिक आता लसीकरणाकरीता तयार झाले असताना लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे.
जिल्हा राज्यात तिसरा....
लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेने जीव तोडून काम केले. नागरिकांना लसीकरणाकरिता जनजागृतीच्या माध्यमातून प्रवृत्त केले. त्यामुळे जिल्ह्यात अल्पावधीत १ लाख ८ हजार जणांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या माध्यमातून जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे.
पावणेतीन लाख लसीकरणाचे नियोजन....
जिल्ह्यातील लसींचा साठा संपला आहे. दरम्यान २ लाख ७८ हजार ८०० लसींची खेप जिल्ह्यात पोहोचल्यानंतर लसीकरण करण्यात येणार असुन त्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. त्यात ११ ग्रामीण रूग्णालयात ५२ हजार ८००, ४० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ९६ हजार, ८० आरोग्य उपकेंद्रामध्ये ९६ हजार, ३ शासकीय संस्थांमध्ये १८ हजार आणि ६ खासगी रूग्णालयांत १६ हजार लसीकरण करण्यात येणार आहे.
पाचशेचा आकडा पार, सहा जणांचा मृत्यू...
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही बाब गंभीर आहे. एकाच दिवशी तब्बल ५७६ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. एकट्या गोंदिया तालुक्यातील ३०३, आमगाव ४४, गोरेगाव १८, अर्जुनी मोरगाव ५४, सडक अर्जुनी ६८, देवरी १४, तिरोडा ६६, सालेकसा तालुका ४ आणि बालाघाट जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे.