गोंदिया - सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम मुरकुडोह क्रमांक १, २ व ३ दंडारी, टेकाटोला व दलदलकुही या अति-नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. या भागातील लोकांचा भात शेती हा मुख्य व पारंपरिक व्यवसाय आहे. येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेऊन चांगली आर्थिक प्रगती करावी व शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे तसेच शासन व पोलीस प्रशासनाप्रती विश्वास व आपुलकीची भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून एकूण २५० शेतकऱ्यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने खरीप हंगामात पेरणीसाठी १०१० या वाणाचे बियाणे (प्रत्येकी २५ कि. ग्रॅ. याप्रमाणे) आणि भेंडी, काकडी, वांगी, पालेभाज्या इ. विविध भाजीपाला वाणाचे (प्रत्येकी १०० ग्रॅम व ५० ग्रॅम याप्रमाणे) पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर बियाण्यांची कशाप्रकारे पेरणी करावी व निगा राखावी याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. नक्षलवाद्यांना भुलथापांना बळी न पडता प्रशासनास मदत करावी, असे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सांगितले.