गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेकाटोला ते मुरुकडोह दंडारी गावाच्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके लपवून ठेवली होती. एका नाल्याखाली डब्यात मोठ्या प्रमाणात इडी (जिवंत बॉम्ब ) लपवून ठेवलेले नक्षल साहित्य जप्त करण्यात सालेकसा पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या घातपातावर देखील आळा बसला आहे.
पोलिसांना खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली होती. सालेकसा हद्दीतील पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करण्याचा नक्षल्यांचा कट होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सी ६० पथकाद्वारे जंगलात सर्च ऑपरेशन राबविले आणि लपवून ठेवलेली स्फोटके शोधून काढली. एका डब्यात सिल्वर रंगाचा दाणेदार स्फोटक पदार्थ ज्यात खिळे व काचांचे तुकडे मिश्रित करण्यात आले होते. अंदाजे १० किलो वजनाचे हे स्फोटक या ठिकाणी आढळून आले. तसेच इलेक्ट्रीक डेटोनेटर, वायर, तारा असे साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
मागील महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा भूसुरंग स्फोट घडवून आणला होता. त्यात १५ जवान हुतात्मा झाले होते. पोलीस विभागाने सीमावर्ती भागात रेड अलर्ट जारी केला होता. मागील आठवड्यात गडचिरोली जिल्यातील एका जहाल नक्षलवाद्याने गोंदिया पोलिसांना समोर आत्मसमर्पण केले होते.