गोंदिया - आधारभूत धान्य खरेदी केंद्राने शासनाची १० कोटीची लूट केल्याचा धक्कादायक खुलासा जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील सहकारी भात गिरणीत उघडकीस आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होताच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सालेकसा सहकारी भात गिरणीचे १० गोडाऊन सीलबंद करत चौकशीला सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धानाला बाजारात विक्री करताना व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये म्हणून गोंदिया जिल्हा मार्केटींग फेडरेशनतर्फे ५७ आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडण्यात आली. मात्र, या आधारभूत धान्य खरेदी केंद्राने शासनाची १० कोटींची लूट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सालेकसा तालुक्यातील सहकारी भात गिरणीत हा प्रकार घडला आहे.
सालेकसा सहकारी भात गिरणीने सण २०१८-१९ या आर्थिक वर्षात सालेकसा आणि कोडजभूरा धान्य खरेदी केंद्रात १ लक्ष ४० हजार ५८३ क्विंटल धान्य खरेदी केले होते. यातील जिल्हा मार्केटींग फेडरेशन तर्फे सालेकसा सहकारी भात गिरणीला आतापर्यंत २० हजार ५०५ क्विंटल धान्याच्या भरडायची ऑर्डर देण्यात आली. मात्र, सध्याच्या घडीला सालेकसा सहकारी भात गिरणीच्या सालेकसा आधारभूत धान्य खरेदी केंद्रात ५३ हजार ३९४ क्विंटल धान्य तर कोडजभुरा धान्य खरेदी केंद्रात ९ हजार ७६१ किलो धान्य उपलब्ध राहायला पाहिजे होते. मात्र दोन्ही केंद्रातील गोडाउनमध्ये २० हजार क्विंटल धान्य उपलब्ध नसल्याने येथील उर्वरित १० कोटींचा ५० हजार क्विंटल धान्य गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची माहिती गोंदियातील राईस मिल व्यापारी मनोज अग्रवाल यांना मिळताच त्यांनी जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडून माहिती घेतली असता हे सत्य उघडकीस आले. त्यानंतर याची तक्रार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सालेकसा सहकारी भात गिरणीने धान्य गोदामात पुन्हा अफरा-तफर करू नये, यासाठी हे १० गोदामे सील करण्यात आली आहेत. सोमवारपासून सील करण्यात आलेल्या गोदामातील धान्याचे वजन करण्यात येईल. तसेच या गोडाऊनचे करारनामे जिल्हा मार्केटींग फेडरेशनने केले होते काय? याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे सालेकसा सहकारी भात गिरणीवर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.