गोंदिया - एकीकडे शासनाकडून सांगितले जात आहे, कि शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी निशुल्क स्वरूपात करण्यात येते तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांकडून कोरोना चाचणीच्या नावावर प्रत्येकी २०० रुपयांची वसुली केली जात असल्याचा प्रकार गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये आज समोर आला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे.
या प्रकरणाची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुढे यांना मिळताच संबंधित प्रकरणातील एका महिला कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरून तातडीने कार्यवाही करण्यात आली. मात्र हा प्रकार आजचा नाही तर यापूर्वी किती प्रकरणे घडली असतील, अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
कोरोना चाचणीसाठी २०० रुपये उकळले -
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात आज एक प्रकरण उघडकीस आले, ते असे कि गोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील दिनेश अशोक रहांगडाले (२६ वर्ष) या रुग्णाची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कुऱ्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ३१ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला त्याच्या स्वगावी सोडण्यात आले. मात्र रुग्णवाहिकेतून उतरताच काही वेळातच त्या रुग्णाला मोठा रक्तस्त्राव सुरु झाला. याची माहिती कुऱ्हाडी आरोग्य विभागाला देण्यात आली.
डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी गोंदिया येथील मेडिकल कॉलेज येथे नेण्यास सांगितले असता रुग्णावर पुढील उचार करण्यासाठी येथील डॉक्टरांनी कोरोना चाचणीसाठी पाठविले. मात्र कोरोना चाचणीसाठी येथील एका महिला कर्मचाऱ्यांनी चाचणीच्या नावावर २०० रुपये वसूल केले. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता रुग्णालयात भरती असलेल्या अनेक रुग्णाकडून प्रत्येकी कोरोना चाचणीच्या नावावर २०० रुपये घेतल्याची माहिती उघडकीस आली.
लेखी तक्रार करण्याचे आवाहन -
हे प्रकरण रुग्णालय अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुढे यांच्याकडे पोहोचले असता त्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत संबधित महिला कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मात्र हे प्रकरण येथेच थांबले असावे, असे म्हणता येणार नाही. कारण यापूर्वी येथे येणाऱ्या रुग्णाकडून आतापर्यंत कोरोना चाचणीच्या नावावर किती रुपये वसूल केले असावे, याचा सदर प्रकरणावरूनच अंदाज वर्तवला जाऊ शकतो. या प्रकरणाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, कि येथे उपचार व कोरोना चाचणी निशुल्क स्वरूपात होते. जर कोणी रुग्णाकडून कोरोना चाचणीच्या नावावर रुपये वसूल करीत असतील तर तातडीने लिखित तक्रार करावी.