गोंदिया - शहरातील गर्दीच्या ठिकाणातून हॅण्डल लॉक नसलेल्या मोटारसायकल पळविणाऱ्या टोळीच्या सदस्यातील चौघांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. यात एक विधी संघर्षीत बालक असून तिघेही नंगपुरा मुर्री येथील आहेत.
गोंदिया शहरातील गर्दीचे ठिकाणी असलेले वैद्यकीय महाविद्यालय आणि मुर्री परिसरातून हॅण्डलला लॉक नसलेल्या मोटारसायकल पळवून त्या मोटारसायकलचे क्रमांक मिटवून ते वाहन विक्री केले जात होते. गोंदिया शहरातून दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. या चोरट्यांवर गोंदिया शहर पोलिसांची बारीक नजर होती. त्यानुसार नंगपुरा मुर्री येथील मोहीम मनीर शेख, बाबुराव महादेव ठाकरे, रूपेश बाबुराव ठाकरे व एका १७ वर्षाच्या विधी संघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्या चौघांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून मोटारसायकल (क्र. एमएच ३५ वाय २४१४, एमएच ३५ एम २१५१) व एक विना क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली.