गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोडगावदेवी वनक्षेत्रांतर्गत सोनेगाव-तिडका मार्गावरील बोदरा येथे आज सकाळी जखमी बिबट्या आढळून आला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले. हा बिबट नेमका कशामुळे जखमी झाला, ते वैद्यकीय परिक्षणानंतर कळेल. सध्या नवेगावबांध येथे प्राथमिक उपचारासाठी त्याला नेण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर येथील गोरेवाडा येथे नेले जाणार आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध हे राष्ट्रीय उद्यान असून या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत. अनेकदा हे वन्यप्राणी गावातही येतात. मात्र सोनेगाव-तिडका या मार्गावर बिबट जखमी असल्याची बातमी वनविभागाला सोमवारी सकाळी कळली. लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी बी. टी. दुर्गे आपल्या सहकाऱ्यांसह बोदरा जंगलात गेले. रस्त्याच्या कडेला असलेल्या टीसीएम नालीत बिबट बसलेला दिसून आला. त्याची हालचाल होत नसल्याने तो जखमी झाला असावा असा तर्क काढण्यात आला. काही वेळातच त्याने समोरच्या पायांचा आधार घेत सरपटत नालीचा उंचवटा ओलांडला. त्याच्या या हालचालीवरून तो पायाने चालू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले.
शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात अडकवन्यासाठी दोन तास लागले. अखेर ब्बट्याला जेरबंद करण्यात आले. लगेच नवेगावबांध येथून पिंजरा बोलावण्यात आला. त्या बिबट्याला अलगद पिंजऱ्यात कैद करण्यात आले. या बिबटचे वय सुमारे अडीच ते तीन वर्षे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हा बिबट्या वाहनाच्या धडकेत, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात की आजारपणामुळे जखमी झाला ते अद्याप स्पष्ट झाले नाही. ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर उघड होणार आहे. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.